Sunday, June 14, 2015

कोकणातला पाऊस - एक अविस्मरणीय अनुभव!


तुम्ही कोकणातला पाउस प्रत्यक्ष अनुभवलाय? नसेल तर तुम्ही एका अविस्मरणीय आनंदाला मुकताय अस म्हटल तर अतिशयोक्ती होणार नाही!

बेभान उफाळणारा अथांग समुद्र आणि किनारयावर झेप घेणाऱ्या फेसाळत्या लाटा, घोंघावणारे वारे आणि त्यासोबत तालात झुलणारी माडाची उंचच-उंच झाडे, अविरत कोसळणारे सुंदर धबधबे, हिरवीगार वनराई.....कोकणचे हे पावसाळी रूप काय वर्णावे!

निसर्गरम्य कोकण प्रदेशातला पावसाळासुद्धा अतिशय नयनरम्य असतो. अगदी डोळ्याच पारणं फेडणारा - ओलाचिंब आणि हिरवागार! पण त्याचा खराखुरा आनंद घ्यायचा असेल तर कोकणातल्या एखाद्या सुंदर गावात किंवा छानशा हॉटेलात काही दिवस तरी मुक्काम ठोकायला हवा. 

नुकतीच इथे पावसाळ्याला सुरवात झालीय. अजून पावसाने तितकासा जोर धरलेला नसला तरी त्याने आपल्या आगमनाची वर्दी देऊन हवेत सुखद गारवा मात्र निर्माण केलाय. वातावरणात अचानक झालेला छान बदल बघून सर्वत्र पक्षी, प्राणी आणि माणसं आनंदित झालेली दिसतात. हवेत एक ताजेपणा आणि उल्हास आणि लोकांच्या चेहऱ्यावर उत्साह जाणवतो...

पाउस पडून दोन-चार दिवस होतात न होतात तोच अचानक जमिनीवर हिरवेगार गवताचे कोंब कुठूनसे फुटायला सुरवात होते आणि असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही कि इतके दिवस ते कुठ लपून बसलेले? जणू एखाद्या नवजात शिशुप्रमाणे जमिनीच्या गर्भात विसावा घेत होते....आतुरतेने पावसाची वाट बघत.....!

आणि इतके दिवस कडक उन्हात तापून वैराण भासणारी कोकणातली तांबडी माती आणि काळाशार कातळ हिरवा गालीचा पसरल्याप्रमाणे सुंदर दिसायला लागतात.

पावसाची खरी मजा लुटायची असेल तर ती इथल्या समुद्रकिनारी! एखाद्या सुंदर चित्रामध्ये शोभावेत असे सागर किनारे हि तर कोकणची खरी संपदा. पावसाळ्यात समुद्राच्या खाऱ्या आणि फेसाळत्या लाटा अंगावर घेतल्याशिवाय कोकण खरेखुरे अनुभवल्याचा पुरता आनंद मिळणारच नाही. आणि अशा वेळी समुद्राला उधाण असेल तर मग त्याचा रोमांच काही औरच! 

कोकणातली अनेक महत्वाची ठिकाणे हळूहळू पर्यटन दृष्ट्या विकसित होताहेत. गोव्याइतकी जरी प्रसिद्ध नसली तरी इथल्या पर्यटनस्थळांचे खास असे वैशिष्ट्य आहे. खरतर गोव्यासारखी गर्दी नसणे हेच अनेकांसाठी एक मोठे आकर्षण आहे. गर्दी नसल्यामुळे कुटुंबासोबत किंवा मित्र-मैत्रीणींच्या सहवासात काही अविस्मरणीय क्षण एन्जॉय करायचे असतील तर कोकणातले बीचेस खरोखरच सर्वोत्तम आहेत!

कोकणात आल्यावर कुठे राहायचे हा प्रश्न तुम्हाला साहजिकच पडेल. पण आनंदाची बाब म्हणजे कोकणात अनेक उत्तम हॉटेल्स आणि रिसोर्ट्स आहेत. सिंधुदुर्ग असो, रायगड असो, मालवण असो कि देवगड; अनेक जुन्या पठडीची आणि नवी आधुनिक हॉटेल्स आणि बीच रिसोर्ट्स इथे तुमच्या सेवेला तत्पर आहेत. 

अगदी टुमदार कौलारू कॉटेजेस पासून ते अत्याधुनिक सुखसोयींनी युक्त अशा मल्टी-स्टोरी लग्झरी हॉटेल्स पर्यंत अनेक पर्याय पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. मालवणी पदार्थांसोबत चायनीज, पंजाबी, इत्यादी विविध पद्धतीचे मेनुज, कम्फर्टेबल रूम्स आणि सुसज्ज बार अशा सर्व सुविधा तुम्हाला इथे सहज मिळू शकतात. त्यामधून तुमच्या बजेटला साजेसा पर्याय तुम्ही नक्कीच निवडू शकता.

पावसाळ्यात येताना तुमचा कॅमेरा मात्र विसरू नका बर का? कितीतरी सुंदर सुंदर दृश्ये आणि अविस्मरणीय क्षण कॅमेराबद्ध करण्याची पर्वणीच तुम्हाला लाभणार आहे. ते मोबाईलवर टिपा आणि मग फेसबुक वर दिमाखात शेअर करा.

मग विचार कसला करताय? अशाच एखाद्या टुमदार हॉटेलच्या लग्ज़ुरिअस सुट मध्ये बसून बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा आनंद अनुभवत कॉफीचे घोट घेण्याचा किंवा तुमच्या फेवरेट मालवणी कुझीन वर ताव मारण्याचा बेत आखायची हीच उत्तम वेळ आहे, नाही का?

तुमच्या कोकणातल्या पावसाच्या काही खास, मजेदार आठवणी किंवा अनुभव असतील तर ते खाली कॉमेंट्स मध्ये नक्की शेअर करा. 

No comments:

Post a Comment