Sunday, August 30, 2015

निसर्गरम्य कोकण – महाराष्ट्राच्या गळ्यातील सुंदर अलंकार!

Beautiful and serene Devgad Beach

कोकण प्रदेशाचं अनुपम सौंदर्य पाहिलं कि त्याला ‘महाराष्ट्राच्या गळ्यातील सुंदर अलंकार’ हीच उपमा द्यावीशी वाटते. अरबी समुद्राच्या लाटा लीलया आपल्या विशाल छातीवर झेलणारा हा निसर्गरम्य प्रदेश देशोदेशीच्या पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आला आहे. निसर्गाचा भरपूर वरदहस्त लाभलेल्या कोकणात लहानथोरांना आवडतील अश्या अनेक गोष्टी आहेत.

सुंदर समुद्रकिनारे, उत्तुंग धबधबे, ऐतिहासिक किल्ले, प्राचीन मंदिरे, ई. अनेक वैशिष्ट्यानी नटलेला हा भूप्रदेश पर्यटनासाठी एक आदर्श ठिकाण आहे यात शंकाच नाही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, पर्यटनाच्या अतिरेकामुळे होणारे ‘साईड-इफेक्ट’ अजून तरी कोकणातील बहुतेक पर्यटनस्थळांपासून दूरच आहेत. त्यामुळे इथे निसर्गाचे सौंदर्य अजूनही बहुतांशी त्याच्या नैसर्गिक’ स्वरुपात अबाधित असलेले आढळते. 

सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारे

कोकणातल्या बहुतेक सर्वच महत्वाच्या ठिकाणांना अतिशय सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारा लाभला आहे. देश-विदेशातील शहरी पर्यटकांसाठी हि अतिशय आकर्षक बाब आहे. मुंबई किंवा गोव्यातील समुद्रकिनारे जर तुम्ही अनुभवले असतील तर तुम्हाला कोकणचं हे वैशिष्ट्य प्रकर्षाने जाणवल्याशिवाय राहणार नाही. पर्यटनदृष्टीने अजून गोव्याइतका विकसित झालेला नसणे हे त्यामागचे एक कारण आहे जे एकप्रकारे कोकणच्या पथ्यावरच पडले आहे असे म्हणायला हरकत नाही.

ज्या पर्यटकांना शहरी गजबजाटापासून दूर, विशाल समुद्राच्या सान्निध्यात, आपल्या कुटुंबियासोबत किंवा मित्रांसोबत काही शांत आणि प्रसन्न क्षण अनुभवायचे असतील त्यांनी कोकणातल्या बीचेसना जरूर भेट द्यावी.

आणि जर तुम्हाला पाण्यातील साहसी क्रीडाप्रकारांमध्ये रस असेल तर कोकणातील अनेक बीचेसवर स्कुबा-डाइविंग, स्नोर्केलिंग, मोटर-बोट राईडिंग, इ. अनेक प्रकारचे वॉटर-स्पोर्ट्स उपलब्ध आहेत. काही बिचेसवर बोटिंगची सुविधादेखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला फेरी-बोटीतून समुद्राची मनोरंजक सफर घडवून आणली जाते.

कोकणातील काही प्रसिद्ध बीचेस पुढीलप्रमाणे:

  • तारकर्ली बीच
  • अलिबाग बीच
  • श्रीवर्धन बीच
  • गणपतीपुळे बीच
  • रेवदंडा बीच
  • मालवण बीच
  • देवगड बीच
  • कुणकेश्वर बीच
  • केळशी बीच
  • हर्णे बीच
  • गुहागर बीच, ई.

पुरातन किल्ले

Devgad Fort

कोकणामध्ये काही दिमाखदार किल्ले आहेत जे या भूमीच्या पुरातन वैभवाची साक्ष देत शतकानुशतके ताठ मानेने उभे आहेत. अथांग समुद्रकिनारा साक्षीला असल्याने हे किल्ले मुखत्वे जलदुर्ग आहेत हे ओघाने आलेच. छत्रपती शिवाजी महाराज, सरखेल कान्होजी आंग्रे, दर्यासारंग सावळ्या तांडेल अशा वीरपुरुषांच्या शौर्याची आणि युद्धकौशल्याची साक्ष देणारे हे गड आणि किल्ले कोकण प्रदेशाचे भूषण आहे. 

मग तो देवगडचा विजयदुर्ग असो कि मालवणचा सिंधुदुर्ग, सागराच्या लाटांना आणि शत्रूंच्या तोफांना समर्थपणे तोंड देत मराठी अस्मितेचे रक्षण करणारे हि जलदुर्ग प्राचीन स्थापत्याचा उत्तम नमुना आहेत. आता जरी काहीसे भग्नावस्थेत असले तरीही त्यांची विचारपूर्वक केलेली योजना आणि मजबूत बांधकाम बघितल्यावर, बांधायला अतिशय अवघड असे हे बुलंद दुर्ग प्राचीन स्थापत्यकारांनी आणि कामगारांनी कसे काय उभारले असावेत याचा विस्मय वाटत राहतो आणि त्या अनामिक कारागीरांच्या कौशल्याला मनापासून दाद दिल्याशिवाय राहवत नाही.

कोकणातील काही प्रमुख किल्ले पुढीलप्रमाणे:

  • अर्नाळा किल्ला
  • मुरुड-जंजिरा किल्ला ( अलिबाग )
  • सिंधुदुर्ग किल्ला ( मालवण )
  • विजयदुर्ग किल्ला ( देवगड )
  • देवगड किल्ला ( देवगड )

देवस्थाने आणि धार्मिक स्थळे

Beautiful Kunkeshwar temple near Devgad

महाराष्ट्रभूमी हि अनेक महान संतांची जन्मभूमी आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांपासून ते शिर्डीच्या साईबाबा, अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि शेगावच्या गजानन महाराजांपर्यंत अनेक संतांच्या अस्तित्वाने हि भूमी पावन झाली आहे. अनेक प्रसिद्ध मंदिरे, मठ आणि आश्रम महाराष्ट्राच्या विविध प्रदेशांमध्ये आढळून येतात.

कोकणातही अनेक धार्मिक क्षेत्रे, देव-देवतांची मंदिरे आणि सत्पुरुषांचे मठ आहेत. धार्मिक पर्यटकांना हि पर्वणीच आहे. गणपतीपुळ्याचे गणेश मंदिर, देवगडजवळील कुणकेश्वर मंदिर, गिर्ये येथील रामेश्वर मंदिर, अशी निसर्गसान्निध्यात असलेली अनेक मंदिरे आणि देवस्थाने भाविक पर्यटकांना आनंद देत असतात.

कोकणातील काही प्रसिद्ध धार्मिक स्थळे पुढीलप्रमाणे:

  • गणेश मंदीर ( गणपतीपुळे )
  • कुणकेश्वर मंदिर ( देवगड )
  • दिर्बादेवी मंदिर ( देवगड, जामसंडे )
  • पोखरबाव गणपती मंदीर ( दाभोळे )
  • रामेश्वर मंदिर ( गिर्ये )      
  • राउळ महाराज मठ ( पिंगुळी, कुडाळ )

कोकण पर्यटन जसजसे विकसित होत आहे तशी पर्यटकांची संख्याहि दिवसेंदिवस वाढत आहे. गोव्याला जाणारे अनेक पर्यटक एक शांत आणि निसर्गरम्य पर्याय म्हणून कोकणातील पर्यटनस्थळांकडे पाहात आहेत. गणेशोत्सव काही दिवसांवर आलेला असताना कोकणातला मान्सून आणि गणेशोत्सव दोन्ही अनुभवण्याची हि सुवर्णसंधी आयतीच चालून आली आहे.

कोकणात राहायला आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त अशी उत्तम हॉटेल्स, बार, रिसोर्ट आणि लॉजिंग-बोर्डिंग हाऊसेस आहेत. लग्झरी हॉटेल्स पासून बजेट हॉटेल्स आणि होम-स्टेज पर्यंत अनेक पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत. तुमच्या आवडीनुसार आणि अर्थातच बजेटनुसार तुम्ही योग्य ठिकाण निवडू शकता.

मग येणार ना या सुटीत कोकण अनुभवायला?

तुमचे विचार आणि अभिप्राय खाली कॉमेंट्स मध्ये जरूर लिहा....

No comments:

Post a Comment