Tuesday, February 16, 2016

आज हॉटेल अलंकारचा पहिला-वहिला वर्धापन दिन !



अनेक दिवसांनी पुन्हा आपल्या भेटीला येण्याचा योग जुळून आलाय. प्रसंग देखील तसाच खास आहे बरं का! आज आधुनिक स्वरूपातील हॉटेल अलंकारच्या वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा म्हणजे एक वर्ष पूर्ण होत आहे. या पहिल्या-वहिल्या वर्धापनदिनानिमित्त सर्व मित्रांना आणि चाहत्यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा!

बरोबर एक वर्षापूर्वी याच दिवशी आपल्या सर्वांच्या आवडत्या हॉटेल अलंकारचा सध्याच्या अद्ययावत स्वरुपात शुभारंभ झाला. नवी देखणी इमारत, ग्राहकांसाठी आधुनिक सुखसोयी, वैविध्यपूर्ण लज्जतदार मेनुज आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नवी उमेद आणि उत्साह घेऊन श्री. प्रशांत हडकर यांनी हॉटेल अलंकारची मुहूर्तमेढ रोवली. आज त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. एक वर्षाचा हा लहानसाच पण अतिशय महत्वाचा टप्पा पार करताना आज सर्वांचेच हृदय आनंदाने आणि अभिमानाने भरून गेले आहे.

हॉटेल अलंकार हे तसं देवगडमधील सगळ्यात जुन लॉजिंग-बोर्डिंग हाउस. जवळजवळ चाळीस-पंचेचाळीस वर्षांची परम्परा असलेलं. ज्या काळात देवगडमध्ये केवळ जुन्या वळणाची कौलारू घरे आणि आधुनिक जीवनशैलीचा स्पर्श तोपर्यंत तरी न झालेली साध्या राहणीमानाची माणसं होती त्या काळात आमचे पूज्य वडील आणि अलंकारचे संस्थापक श्री. दत्ताराम हडकर यांनी मोठ्या कल्पकतेने लॉज सुरु करून एक नवा पायंडाच पाडला असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. अल्पावधीतच देवगडमधील आणि बाहेरगावांतून येणाऱ्या प्रवाश्यांसाठी ‘हडकरांचे अलंकार लॉज’ हे एक खात्रीचे, विश्वासाचे आणि आपुलकीचे ठिकाण बनले.

त्यानंतर गेल्या चाळीस वर्षात देवगड खूप विकसित होत गेले. अनेक नव-नवीन हॉटेल्स उदयाला आली. परंतु अलंकार त्या सर्वांमध्येहि आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान टिकवून राहिले. यामागे अर्थातच श्री हडकर आणि त्यांचे कुटुंबीय तसेच अनेक मित्र, हितचिंतक आणि चाहते या सर्वांचा महत्वाचा हातभार लागला आहे यात शंकाच नाही. या सर्वांचेच आम्ही अत्यंत ऋणी आहोत.

कालाय तस्मै नमः असे संस्कृत वचन सर्वश्रुतच आहे. काळ बदलला तसं राहणीमान बदललं. आधुनिक शहरी जीवनशैलीचं आकर्षण, विशेषतः तरुण पिढीमध्ये, वाढत गेलं. लोकांच्या दृष्टीकोनात बदल होत गेला, अपेक्षा वाढल्या, इच्छा-आकांक्षांच्या कक्षा रुंदावल्या. देवगडमध्ये येणाऱ्या शहरी पर्यटकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत गेली. मुंबई, पुणे, कोल्हापूर अश्या शहरांतून कोकणच्या निसर्गरम्य प्रदेशाचा, विशाल समुद्राकिनाऱ्याचा आणि लज्जतदार मालवणी जेवणाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी देवगडला येणाऱ्या या पर्यटकांसाठी आधुनिक सुखसोयींनी सज्ज अश्या हॉटेल्सची आवश्यकता भासू लागली. या नव्या बदलाला अनुसरून नवा चेहरा-मोहरा लेऊन १६ फेब्रुवारी २०१५ या दिवशी हॉटेल अलंकार जनतेच्या सेवेला रुजू झाले.

या बदलाला लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आणि सतत मिळतो आहे. उत्तम सुखसोयी देणारं तसेच आपुलकीने आणि तत्पर सेवा देणारं असं देवगड मधीलच काय पण कोकणातील हमखास भेट देण्याजोगं हॉटेल म्हणून अलंकार हॉटेलला लोकांची अधिकाधिक पसंती दिवसेंदिवस मिळते आहे याचा आम्हाला आनंद वाटतो.

आजच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आमच्या सर्व ग्राहकांचे आणि मित्रांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. आपला आमच्यावर स्नेह आहेच, तो अधिकधिक वाढावा आणि आपल्याला अशीच उत्तम सेवा देण्याची सुसंधी आम्हाला मिळत राहावी हीच सदिच्छा.

No comments:

Post a Comment