Thursday, April 14, 2016

देवगड – उन्हाळ्याची सुटी मजेत घालवण्यासाठी महाराष्ट्रातील एक विकसनशील पर्यटनस्थळ

शांत आणि सुंदर देवगड बीच
एप्रिल महिन्यात शाळा-कॉलेजातील मुलांची उन्हाळ्याची सुटी सुरु झाली कि लोकांना वेध लागतात ते प्रवासाला निघण्याचे. अगोदरच प्रदूषित आणि आता उन्हाळी आग ओकणाऱ्या सूर्याच्या उष्णतेने तापलेल्या रखरखीत शहरी हवामानापासून दूर कुठेतरी निसर्गरम्य, हिरव्यागार आणि शीतल प्रदेशात जाऊन राहण्याचे बेत अगदी मार्चमधेच सुरु होतात.

पाहताक्षणी मनाला भुरळ पडेल असे आणि उन्हाळ्याच्या सुटीचा भरपूर आनंद घेता येईल तसेच खिशाला सुद्धा परवडेल असे एक उत्तम ठिकाण म्हणजे अप्रतिम कोकण! अगदी गोव्यासारख्या प्रसिद्ध आणि विकसित पर्यटनस्थळाचा विसर पडेल अशा अनुपम निसर्गसौंदर्याची गर्भश्रीमंती लाभलेला हा भूप्रदेश अनेकांचे आवडते उन्हाळी पर्यटन स्थळ होऊ पाहत आहे यात काहीच आश्चर्य नाही.

मुंबई-पुण्यासारख्या शहरात राहणारे अनेक नोकरदार लोक अगदी वर्षभर याच दिवसांची वाट पाहत असतात. कोकणातील एखाद्या निसर्गरम्य गावामधील छानशा हॉटेलमध्ये राहायचे, दिवसभर भटकंती करत पर्यटनस्थळ पहायची, त्या-त्या प्रदेशातील लोक, त्यांच्या चाली-रिती, जीवनपद्धती, सगळे अगदी प्रत्यक्ष जवळून अनुभवायचे, तेथील स्थानिक खाद्य-पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घ्यायचा, स्थानिक बाजारपेठांमध्ये फेरफटका मारून त्या भागातील काही वैशिष्ट्यपूर्ण वस्तू सोवेनीर म्हणून, म्हणजे या दिवसांची आठवण म्हणून, विकत घ्यायच्या..... अशी स्वप्न रंगवत कोकण प्रवासाचा बेत आखला जातो. हि स्वप्न सत्यात आणायची असतील तर कोकणातील एखादे सुंदर ठिकाण पाहायला हवे.

निसर्गाचा वरदहस्त लाभलेला कोकणप्रदेश


कोकणचा सुंदर समुद्रकिनारा
रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना....आशा भोसलेंच्या या अजरामर गीताची आठवण करून देणारा असा हा कोकणचा समुद्रकिनारा. कोकण म्हटले कि सर्वप्रथम आठवतात ते विस्तीर्ण आणि शांत असे समुद्रकिनारे आणि सागरी वाऱ्यासोबत आपल्याच मस्तीत झुलणारी माडांची ताड-माड उंच झाडे. कोकणपट्टीवरील असे अनेक बीचेस अनुभवी तसेच नव्या पर्यटकांना सदैव साद घालत असतात. किनाऱ्याकडे झेपावणाऱ्या उफाळत्या सागरलाटा बघून मन एका अननुभूत आत्मिक आनंदाने आणि शांतीने भरून येते. जीवनातल्या क्षणिक सुख-दु:खांचा काही काळ विसर पाडण्याचे अद्भुत सामर्थ्य कोकण प्रदेशातल्या या विराट समुद्राच्या दर्शनामध्ये आहे एवढे खरे.

अथांग समुद्र आणि सुंदर खाड्या, श्वास रोखायला लावणारे उत्तुंग जलप्रपात, नारळ-सुपारीच्या आणि आंबा-काजूच्या हिरव्यागार बागा, समुद्रात बांधलेले ऐतिहासिक वारसा मिरवणारे मजबूत जलदुर्ग, समुद्रकिनाऱ्यावर वसलेली एखाद्या सुंदर जलरंगातील चित्राप्रमाणे भासणारी टुमदार गावे आणि शांत सागरतटांची शोभा वाढवणारी सुंदर-सुंदर देवालये.....कोकणचे सौंदर्य डोळ्यात सामावून घेताना सुटीचे चार दिवस कसे निघून जातील याचा पत्ता देखील लागणार नाही एवढा मौजमजेचा खजिनाच आहे या प्रदेशाकडे.

गोव्यासारख्या इतर विकसित पर्यटनस्थळांच्या तुलनेत हा खजिना तसा बहुतांशी अस्पर्शितच आहे. आणि हीच गोष्ट अनेकांना भावते आणि त्यांची प्रवासाची गंमत अधिकच वाढवते. त्याच-त्या घिस्या-पिट्या मळलेल्या वाटांवरून जाण्यापेक्षा नव-नवीन प्रदेशांची मुशाफिरी करण्यातलं थ्रिल काही औरच, नाही का?

देवगड - कोकणात सुटीचा आनंद घेण्यासाठी उत्तम ठिकाण


कोकण-सफरीचा खराखुरा आनंद घ्यायचा असेल तर निदान एक आठवड्याभराची तरी उसंत काढायलाच हवी. पाहण्यासारख्या ठिकाणांची आणि अनुभवण्यासारख्या गोष्टींची इथे बिलकुल कमतरता नाही. चला तर, आपण कोकणातल्या देवगड या एका वेगाने विकसित होत असलेल्या पर्यटन स्थळाची थोडक्यात ओळख करून घेऊया.


देवगड – देवांचा लाडका प्रदेश आणि हापूस आंब्याचे माहेरघर


देवगड हापूस आंबा 
देवगड हे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वसलेले छोटेसे टुमदार तालुक्याचे शहर. देवगडची ओळख अनेकांना देवगडच्या जगप्रसिद्ध हापूस आंब्यामुळे असते. फळांचा राजा आंबा आणि समस्त आंब्यांचा महाराजा हा देवगडचा हापूस आंबा! उन्हाळ्यात देवगडला जायचे आणि हापूस आंब्याची लज्जत त्याच्या स्वत:च्या माहेरघरातच चाखायची म्हणजे आंबा-प्रेमींसाठी पर्वणीच. पण देवगड म्हणजे केवळ हापूस आंबाच नाही बर का! या शहरात फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत, खाण्यासारखे अनेक चमचमीत मालवणी पदार्थ आहेत आणि राहायला उत्तम हॉटेल सुविधा देखील आहेत.

देवगडला कसे पोहोचाल?


मुंबई-पुण्यासारख्या महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमधून देवगडला जाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुमची स्वतःची गाडी असेल तर उत्तमच, अन्यथा तुम्ही प्रायवेट गाडीचे बुकिंग करून देवगडचा प्रवास करू शकता. अनेक कंपन्यांच्या मुंबई-देवगड किंवा पुणे-देवगड आरामगाड्या ( लग्झरी बसेस ) उपलब्ध असतात. कमी खर्चात प्रवासासाठी एस. टी. चा पर्याय आहेच. आणि तुम्हाला रेल्वेचा प्रवास आवडत असेल तर कोकण रेल्वेने कणकवली स्टेशन ( देवगडपासून ६० किलोमीटर ) गाठून तिथून पुढे नांदगाव पासून बसने किंवा ऑटोने देवगडला पोहोचणे हा देखील एक उत्तम मार्ग आहे.

देवगडमध्ये कुठे राहाल?


देवगडमध्ये कुठे राहायचे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. देवगड शहरात चांगल्या हॉटेल्सची कमी नाही. तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही योग्य अकोमोडेशन निवडू शकता. पारंपारिक थाटाच्या स्वस्त लॉजेस पासून ते अगदी आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त प्रीमिअम हॉटेल्स देवगडमध्ये आहेत.

तुम्हाला जर अगदी बीचजवळ राहायचे असेल तर हॉटेल गलक्सी किंवा हॉटेल रंगोली सारखी सी-फेसिंग हॉटेल्स आहेत जिथून समुद्राचा सुंदर देखावा न्याहाळता येतो. याशिवाय हॉटेल डायमंड, निवांत रिसोर्ट, हॉटेल पारिजात (रसोई), अशी इतर अनेक चांगली हॉटेल्स देवगडमध्ये आहेत.

हॉटेल अलंकार हे देवगडमध्ये अगदी मध्यवर्ती ठिकाणी असलेले अत्याधुनिक हॉटेल आहे. कपल्स तसेच कुटुंबांसाठी राहण्याची उत्तम सोय, लज्जतदार मालवणी, पंजाबी, चायनीज, तंदूर इत्यादि प्रकारचे जेवण आणि आधुनिक बारची देखील सोय असल्यामुळे हॉटेल अलंकार हे अनेक स्थानिकांचे आणि पर्यटकांचे मनपसंत हॉटेल आहे. इथून एस. टी. बसेस, रिक्षा, प्रायवेट गाड्या, ई. अगदी जवळच उपलब्ध असल्याने जवळपासच्या पर्यटनस्थळांना जाणं खूपच सुलभ आहे.

देवगडमध्ये काय पाहाल?


बीचवरून पवनचक्क्यांकडे घेऊन जाणाऱ्या पायऱ्या  
खुद्द देवगडमध्ये आणि देवगडच्या सभोवतालच्या परिसरात पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. देवगडचा शांत आणि सुंदर समुद्रकिनारा आणि वाऱ्यावर डोलणाऱ्या हिरव्यागार माडांच्या बागा मन मोहून घेतात. किनाऱ्यावर सुरुंच्या झाडांचे बन आहे. तिथली निरव शांतता, झाडांची शीतल सावली, झाडांमधून वाहणाऱ्या वाऱ्याचा मंद ध्वनी, पक्ष्यांची मधुर किलबिल, आणि समोर पसरलेल्या अथांग समुद्राची धीरगंभीर गाज. मानसिक शांती म्हणजे काय ते इथे चार घटका बसल्यावर अनुभवायला मिळते.

देवगड पवनचक्क्या
बीचच्या एका टोकाला असलेल्या टेकडीवर, समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्याच्या रेट्याने संथपणे फिरणाऱ्या आठ प्रचंड पवनचक्क्या आहेत. खालच्या अंगाला असलेल्या मुख्य बीचवरून टेकडीवरील पवनचक्क्यांकडे चढून जायला वळणदार चिरेबंदी पायऱ्या आहेत. या पायऱ्यांवर बसूनदेखील समुद्र न्याहाळता येतो. मधेच डॉल्फिन माशांची एखादी टोळी पाण्याच्या पृष्ठभागावरून हवेत सूळकांड्या मारताना दिसते. आकाशामध्ये घारी आणि ससाणे घिरट्या घालताना पाहायला मिळतात. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी लालबुंद सूर्यबिंब हळूहळू समुद्रात बुडताना पाहणे आणि पौर्णिमेच्या रात्री एखाद्या खडकावर बसून चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेल्या समुद्राची अद्भुत शोभा पाहणे हे खरोखरीच अविस्मरणीय अनुभव आहेत.

देवगड किल्ला 
बीचच्या दुसऱ्या टोकाला ऐतिहासिक देवगड किल्ला आहे. किल्ल्याच्या मजबूत तटबंदीमध्ये मराठी आरमाराच्या बुलंद इराद्यांची झलक दिसून येते. किल्ल्याच्या परिसरात एक लहानसे गणेश मंदिर आहे. रात्रीच्या अंधारात बोटींना मार्गदर्शन करण्यासाठी फिरता प्रकाशझोत टाकणारे एक लाईट-हाउस आहे. किल्ल्याच्या परिसरातून फिरताना शुभ्र स्थलांतरित बगळ्यांचे थवेच्या थवे दृष्टीला पडतात. एकसाथ हवेत झेपावणाऱ्या या पक्ष्यांचा अगदी योग्य क्षणी फोटो टिपण्यात अनोखी गंमत आहे.

विजयदुर्ग किल्ला 
 देवगडपासून जवळच म्हणजे साधारण २१ किलोमीटर अंतरावर सुमारे आठशे वर्षांपूर्वी राजा भोज याने बांधलेला अभेद्य असा विजयदुर्ग किल्ला आहे. जवळजवळ सतरा एकर परिसरात पसरलेला हा भव्य किल्ला पुरातन स्थापत्याचा एक सुंदर नमुना आहे. नंतरच्या काळात शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेल्या या जलदुर्गाची भक्कम तटबंदी, उंच बुरुज, तोफा अशा अनेक गोष्टी किल्ल्यामध्ये फेरफटका मारत पाहण्यासारख्या आहेत.


देवगड जवळील प्रसिद्ध कुणकेश्वर मंदिर
देवगडपासून सुमारे ११ किलोमीटरवर समुद्रतटावर वसलेले आणि एका सुंदर दंतकथेची पार्श्वभूमी असलेले कुणकेश्वर शिवमंदिर हे देखील अनेक भाविक पर्यटकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला इथे मोठी जत्रा आणि उत्सव असतो. दुरदुरच्या शहरांतून आणि गावांमधून भाविक लोक या जत्रेला हजेरी लावतात. 

नव्याने बांधलेल्या पुलामुळे देवगडमधील तारामुंबरीहून कुणकेश्वरला जाणे आता अधिकच सुलभ झाले आहे. 



देवगडमध्ये काय आणि कुठे खाल?


कोकणातील सर्वच शहरांप्रमाणे देवगडमधील बहुतेक हॉटेलांमध्ये उत्तम मालवणी जेवण मिळण्याची सोय असते. इथल्या किनाऱ्यावर सरंगा, सुरमई, पापलेट, पेडवे, सवंदाळे, चिंगुळ ( कोलंबी ), कुर्ल्या ( खेकडे ), शिंपल्या, कालव इत्यादी अनेक प्रकारचे मासे आढळून येतात. त्यांच्यापासून बनवलेले अनेक लज्जतदार मालवणी मेनुज तुम्ही इथल्या हॉटेल्समध्ये एन्जॉय करू शकता.

लज्जतदार मालवणी जेवण 


हॉटेल वसंत विजय हे देवगडमधील मालवणी जेवणासाठी सुप्रसिद्ध असे हॉटेल आहे. निखील हॉटेल, नक्षत्र हॉटेल अशी अगदी हमरस्त्याला लागून असलेली हॉटेल्स शाकाहारी आणि मांसाहारी पर्यटकांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी सज्ज आहेत. तुम्ही हॉटेल अलंकारच्या प्रशस्त आणि सुशोभित डायनिंग हॉलमध्ये किंवा फ्यामिली रूममध्ये बसून आपल्या जोडीदारासोबत किंवा कुटुंबासोबत लज्जतदार मालवणी, पंजाबी, चायनीज वगैरे पदार्थांवर ताव मारु शकता. आणि जर का तुम्ही कट्टर शाकाहारी असाल तर फक्त शाकाहारी जेवण मिळणारे हॉटेल प्रपंच आहे.

आंबे, काजू, फणस अशी स्थानिक फळे आणि त्यापासून बनवलेले आंबापोळी, आमरस, आंबा-बर्फी, फणसपोळी, काजू-बर्फी ई. अनेकविध खाद्यपदार्थांवर ताव मारण्यासाठी हाच उत्तम सिझन आहे. कैरीचं पन्ह, उसाचा रस, कोकम सरबत, लिंबू सरबत अशी खास उन्हाळी पेय पिण्यासाठी अनेक कोल्ड्रिंक शॉप्स जागोजागी आहेत. मद्य शौकिनांसाठी अलंकार हॉटेलच्या "विसावा" बार सारखे उत्तम बिअर बार देखील आहेत.


देवगडमध्ये काय आणि कुठे खरेदी कराल?


देवगड हे तसे लहान तालुक्याचे ठिकाण असल्याने इथे मोठी बाजारपेठ, शॉपिंग सेंटर, मॉल वगैरे अजून तरी नाहीत. परंतु इथे अनेक चांगली दुकाने आहेत जिथे तुम्हाला कपड्यांची, वस्तूंची खरेदी करता येईल. गावातल्या आठवड्याच्या बाजाराची गंमत अनुभवायची असेल तर देवगडच्या शुक्रवारच्या बाजारात फेरफटका मारावा. इथे तुम्हाला फळे खरेदी करता येतील किंवा बाजाराच्या रस्त्यालाच लागून असलेल्या दिलखुश हॉटेलमध्ये मिसळपाव किंवा कुर्मा-पुरीचा आनंद घेता येईल.

उन्हाळ्यामध्ये अनेकजण आंब्याच्या पेट्या स्वतःसाठी आणि आप्तेष्टांसाठी जाताना बरोबर घेऊन जातात. अनेकजण इथल्या स्थानिक कंपन्यांचे आंब्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ, जसे आंबा जाम, आंबा पल्प, इत्यादी देखील आवडीने नेतात.


आता देवगडमध्ये स्कुबा डायविंगसुद्धा एन्जॉय करा!



अंडरवॉटर-स्पोर्ट्स शौकिनांसाठी एक मस्त खुशखबर म्हणजे देवगड बीचवर नुकतेच सुरु करण्यात आलेले स्कुबा डायविंग सेंटर. आता या खेळांचा आनंद लुटण्यासाठी गोवा अथवा मालवणला (तारकर्ली) जाण्याची गरज नाही. आता देवगडमधेच तुम्ही बच्चेकंपनीसोबत स्कुबा डायविंग एन्जॉय करू शकता. स्कुबा डायविंग व्यतिरिक्त इथे तुम्ही स्नोर्केलिंग, सी-राफ्टींग, बनाना राईड्स, बम्पर राईड्स, जेट-स्की राईड्स, इत्यादी समुद्रातल्या धम्माल खेळांची थरारक अनुभूती घेऊ शकता.  

उन्हाळ्याच्या सुटीत फिरायला जाण्यासाठी एखादे नवे आणि शांत ठिकाण शोधत असाल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड हा एक उत्तम पर्याय आहे. तालुका ठिकाण असल्याने बहुतेक सर्व शहरी सोयी-सुविधा आहेत आणि समुद्राच्या सान्निध्यातील या शहरवजा गावात शहरी गजबजाटापासून दूर मिळणारा निवांतपणा देखील आहे.

मग काय, हि उन्हाळ्याची सुटी देवगडमध्ये एन्जॉय करायचा प्लान करताय ना? तुमचे विचार आणि तुम्हाला देवगडबद्दल अधिक माहिती हवी असल्यास खाली कॉमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहा.